बाईकवर नाही, शववाहिकेतूनच पोहोचवून दिला तो मृतदेह

पोलिसांनी अडवून करून दिली व्यवस्था

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे नेहमीच काढले जातात. यातच गेल्या २० जुलै रोजी शववाहिका नसल्याने एका रुग्णाचा मृतदेह बाईकवरून न्याव्या लागल्याच्या बातम्यांनी गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतू या घटनेतील वास्तविक परिस्थिती वेगळीच असून प्रत्यक्षात तो मृतदेह भामरागड नगर पंचायतच्या शववाहिकेतून त्यांच्या गावी पोहोचवून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी (२३ वर्ष) या युवकाचा दि.२० जुलै रोजी हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी तो बांडेनगर येथे एका पुजाऱ्याच्या घरी राहून घरगुती उपचार घेत होता. पण पोटाचा त्रास वाढल्याने तो दि.१७ ला लोकबिरादरी रुग्णालयात आला. दि.१९ ला त्याला क्षयरोग झाल्याचे निदानही झाले. पण पुढील उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ दिलीप लालसू तेलामी याने मृतदेह नेण्यासाठी गाडी मागितली, पण आरोग्य सेविकांनी आमच्याकडे गाडी नाही, असे सांगितले. दुसरीकडे कुठे शववाहिका मिळते याची माहिती नसल्याने आणि नदीवरील पुलावर पुन्हा पुराचे पाणी चढल्यास मृतदेह नेणे शक्य होणार नाही, म्हणून दिलीप तेलामी याच्यासह इतर नातेवाईकांनी बाईकवरच खाटेला बांधून गणेशचा मृतदेह घेऊन जाण्याचे ठरविले. पण थोडे अंतर पुढे जाताच पोलिसांनी त्यांना अडवत मृतदेह अशा पद्धतीने नेण्याचे कारण विचारले. वस्तुस्थिती लक्षात येताच पोलिसांनी तालुका आरोग्य अधिकारी डॅा.चौधरी यांना याबद्दल कळविले. डॅा.चौधरी यांनी लगेच भामरागड नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देऊन शववाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर गणेश तेलामी यांच्या मृत्यूची भामरागड ग्रामीण रुग्णालयात रितसर नोंद घेऊन मृतदेह शववाहिकेने १० किलोमीटरवर असलेल्या कृष्णार या गावी पोहोचवून देण्यात आला.

यासंदर्भातील सविस्तर अहवाल, मृत गणेश तेलामी याचा भाऊ दिलीप याच्या लेखी बयाणासह भामरागड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.