महागावमधील शेतकऱ्याचा शेतात वीज पडून मृत्यू

यावर्षी नैसर्गिक आपत्तीचे चार बळी

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव येथे बुधवारी सकाळी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यृ झाला. लक्ष्मण नानाजी रामटेके (५४ वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नानाजी हे शेतात काम करत असताना विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्याचवेळी वीज पडल्याने ते शेतातच कोसळून मरण पावले. यावर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमधील ते चौथे बळी आहेत. दरम्यान प्रशासनाने गुरूवार दि.२७ साठी रेड अलर्ट दिला आहे.

महागाव बु. येथील शेतकरी बुधवारी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले असताना ही घटना घडली. तालुक्यातील अहेरी, महागाव, चेरपल्ली, वांगेपल्ली, नागेपल्ली, आलापल्ली, पुसुकपल्ली आदी गावांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा होता. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. दरम्यान वीज कोसळल्याची माहिती मिळताच गावकरी तसेच कुटुंबीयांनी शेताच्या बांधावर धाव घेतली. मृत लक्ष्मण रामटेके यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, जावई व नातू असा आप्त आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रामटेके परिवारावर डोंगर कोसळले आहे. कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

यावपूर्वी भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुरात आणि कारवाफा येथील नाल्याच्या पुरात प्रत्येकी एक जण वाहून गेला. तर धानोरा तालुक्यातील पवनी येथे वीज पडून एक जण दगावला.