Home दैनंदिन बातम्या नाडेकल पूल बांधकाम प्रकरणी चोर सोडून संन्याशाला फाशी !

नाडेकल पूल बांधकाम प्रकरणी चोर सोडून संन्याशाला फाशी !

अरविंद कात्रटवार यांचा आरोप

पडलेल्या पुलाच्या ठिकाणी निदर्शने करताना अरविंद कात्रटवार आणि कार्यकर्ते

गडचिरोली : कोरची तालुक्यातील नाडेकल-बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वीच कोसळल्याची गंभीर घटना घडल्यानंतर या पुल बांधकामाची चौकशी करण्यात आली. मात्र त्यात या प्रकरणाला जबाबदार असलेले कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यासह दोषींवर कारवाई करण्याऐवजी पुलाचे डिझाईन तयार करणाऱ्याला जबाबदार धरण्यात आल्याने हा प्रकार ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी केला आहे.

दोषींवर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही कात्रटवार यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.

कोसळलेल्या पुलाची अरविंद कात्रटवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पाहणी केली. या पुलाचे बांधकामच निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराला कंत्राटदारासह तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 आणि सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता असलेले सुरेश साखरवाडे हे जबाबदार असल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला.

गडचिरोली जिल्हयात तब्बल 8 वर्षांपासून एकाच विभागात ‘भुजंगा’सारखे ठाण मांडून बसलेल्या सदर कार्यकारी अभियंत्यावर निकृष्ट पुल बांधकाम प्रकरणी फौजदारी कारवाई करून कोटयवधीच्या शासकीय रकमेची वसुली करण्यात यावी. कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करणार, असा इशारा कात्रटवार यांनी दिला आहे.

गडचिरोलीत ठाण मांडण्याचा प्रयत्न

कोरची तालुका दुर्गम असून अनेक गावात जाण्यासाठी अद्यापही पक्के रस्ते व नदी नाल्यांवर पुल नाही. नाडेकल हे गाव अतिदुर्गम भागात आहे. या गावाला जोडणाऱ्या खोब्रागडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 गडचिरोली अंतर्गत अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलावरून रहदारी सुरू होण्यापुर्वीच पूल कोसळला ही धक्कादायक व गंभिर बाब आहे. पूल बांधकामात मोठी हयगय करण्यात आली आहे. पुलाच्या पिलरची खोदाई कमी आहे. बांधकामात अल्प लोखंड व निकृष्ट गिट्टी व सिमेंटचा वापर करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मात्र भ्रष्टाचाऱ्यांना ‘अभय’ दिले जात आहे, असा आरोप कात्रटवार यांनी केला.

अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती मिळवून गडचिरोलीतच ठाण मांडण्यासाठी कार्यकारी अभियंता मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचा ‘राजाश्रय’ घेऊन ‘फिल्डींग’ लावत असल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला आहे.

याप्रसंगी यादव पा.लोहंबरे, विनोद चापले, यादव चौधरी, गोपाल मोंगरकर, स्वप्नील जुमनाके, प्रशांत ठाकुर, प्रकाश भजभुजे, कैलास लाडे, सारंग सेलाटे, गणेश बामणवाडे, नंदकिशोर सेडमाके, महेश भोयर, नेत्रेश कोलते, रुपेश कोलते, नितेश बुंराडे, सुभम समर्थ, राकेश मस्के, प्रकाश ठाकरे, सुरेश वाघमारे, सोनु सोरते, राहुल सावरकर, विश्वनाथ भानारकर, विलास ढोलणे, विकास ठाकरे, साईल कोहपरे, शाम झोळे, ज्ञानेश्वर लोहंबरे, राजु डोईजड, प्रमोद कोवे, दीपक कोसमशिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.