आलापल्लीतील तालुका क्रीडा संकुलाच्या बेशिस्त वापरावर येणार मर्यादा

अपर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अहेरी : युवा वर्गाच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या बेशिस्त आणि गैरवापरावर आता मर्यादा येणार आहे. आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या वापरासंदर्भात अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

अहेरी तालुक्याचे क्रीडा संकुल आलापल्ली येथे उभारण्यात आले आहे. त्यात अलिकडेच दोन लाकडी बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहेत. या क्रीडांगणावर खेळाडू, युवक फुटबॅाल, क्रिकेट, व्हॅालिबॅाल, हॅाकी इत्यादी मैदानी खेळ खेळतात. परंतू आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या पटांगणाचा व बॅडमिंटन कोर्टचा वापर गैरक्रीडाविषयक कामांसाठी केला जात असून त्यामुळे पटांगण आणि बॅडमिंटन वुडन कोर्टसुद्धा खराब झाल्याची तक्रार खेळाडूंनी केली होती. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी प्रत्यक्ष क्रीडांगणाची पाहणी केली असता त्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले.

क्रीडांगणाची दुरवस्था थांबवण्यासाठी आलापल्लीच्या क्रीडांगणाच्या वापराची परवानगी देताना तहसीलदार तथा तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष यांनी अपरिहार्य परिस्थितीत आणि दक्षतापूर्वक द्यावी, बॅडमिंटन कोर्टवर सांस्कृतिक किंवा इतर कार्यक्रमासाठी परवानगी देऊ नये, क्रीडांगणाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन भाकरे यांनी केले आहे.