अधिवेशनकाळातच धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकीवजा इशारा का?

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाही केली होती पत्रकबाजी

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच मंत्रीपदाची शपथ घेणारे धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रकातून धमकीवजा इशारा दिला आहे. यापूर्वी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (डिसेंबर 2022) धर्मरावबाबांना अशाच पद्धतीने एका पत्रकातून धमकी मिळाली होती. आता पावसाळी अधिवेशन सुरू असताना पुन्हा एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रकाच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारलाच हा इशारा असल्याचे मानले जात आहे.

तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरजागड लोहखाणीतून कच्चा माल काढण्यास प्रोत्साहन दिले होते. विद्यमान पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोहप्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. या भागातील खनिज संपत्तीचे खनन करण्यासाठी लॅायड्स मेटल्ससह इतर पाच कंपन्यांना लिज दिली जात आहे. लोहखाणीच्या विस्तारातून रोजगाराच्या संधी वाढून स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावेल अशी धर्मरावबाबा आणि सरकारची भूमिका आहे. मात्र खाणींच्या लिजला नक्षलवाद्यांनी आधीपासून विरोध दर्शविला आहे. स्थानिक नागरिकांचाही याला विरोध असल्याचे सांगत या खाणींमुळे आदिवासींचे जंगल, जमीन उद्ध्वस्त होत असून त्यामुळे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा प्रतिबंधित कॅाम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दिला आहे. या पत्रकावर 5 जुलै 2023 ही तारीख असली तरी ते पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर व्हायरल झाले आहे.

एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणींच्या विरोधात लोकांकडून आंदोलन सुरू आहे. धर्मरावबाबा यांनी गेल्या महिन्यात या आंदोलकांची भेट घेऊन नागरिकांच्या मागण्या सरकारदरबारी मांडणार असल्याचे सांगितले. पण त्यानंतरही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. आता कोनसरी येथील लॅायड्स मेटल्सचा लोहप्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या राेजगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जनसमर्थनाचे पारडे कोणत्या बाजुने झुकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी झाले होते धर्मरावबाबांचे अपहरण
यापूर्वी 1990 च्या घरात धर्मरावबाबा आमदार असताना नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण करून जवळपास दोन आठवडे यांना जंगलात ठेवले होते. त्यानंतर मध्यस्थामार्फत त्यांची सुटका केली होती. सुरजागड पहाडावरील लॅायड्स मेटल्सच्या खाणीच्या विस्ताराबाबत गेल्यावर्षी जनसुनावणी घेण्यात आली. मात्र स्थानिकांचा विरोध जुगारून सरकार हे लोहखनिज काढत आहे, असा आरोप करीत हे काम बंद करावे अन्यथा परिणाम भोगावे लागेल, अशी धमकी नक्षलवाद्यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (डिसेंबर 2022) धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला एका पत्रकातून दिली होती. त्यानंतर धर्मरावबाबा यांना वाय सुरक्षा देण्यात आली. आता दुसऱ्यांदा त्याच आशयाचे पत्रक मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणेवरचा ताण काहीसा वाढला आहे.