नातवाला वाचवायला गेलेल्या आजोबांनाही लागला कुलरचा करंट

मुलचेरा : कपडे वाळायला टाकताना कुलरच्या वायरचा स्पर्श होऊन नातवाला करंट लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आजोबांनाही करंट लागला. दोघांवरही अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कोलपल्ली येथील भाऊराव पत्रुजी सिडाम यांचा नातू सागर देवराज आत्राम हा कुलरजळ कपडे वाळायला टाकत होता. ओले कपडे आणि कुलरच्या वायरचा हाताला स्पर्श झाला. त्यामुळे वायरमध्ये असलेल्या विद्युत प्रवाहाने सागरच्या हाताला करंट लागला आणि तो कुलरला चिकटला. हे पाहून आजोबा भाऊराव हे मदतीसाठी धावले आणि ते नातवाला ओढू लागले. त्यामुळे त्यांनाही करंट लागला. पण लगेच ते फेकल्या गेले.

दोघांनाही लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, बुधाजी सिडाम, कुमार गुरनुले, राकेश सडमेक व कार्यकर्ते उपस्थित होते.