पूरग्रस्त भागातील पिकांचे सर्वेक्षण करून भरपाईसाठी प्रामाणिकपणे सहकार्य करा

बैठकीत खा.नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदीलगतच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा आढावा घेण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी ब्रह्मपुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला ब्रह्मपुरीचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पूरग्रस्त शेतातील पिकांचे तत्काळ सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रामाणिकपणे सहकार्य करा, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी दिले.

गोसेखुर्द धरणातून वारंवार होणाऱ्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन ब्रह्मपुरी तालुक्यातील ४७ गावे बाधीत झाली. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भात पीक, तूर पीक, सोयाबीन, भाजीपाला आणि कापूस आदी पिकांचे खूप नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्यासाठी पूरग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे झाले पाहिजे. अधिकारी वर्गाने दफ्तरदिरंगाई करू नये. कोणताही पूरग्रस्त शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहता कामा नये. याकरिता अधिकाऱ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवावा, असे निर्देश यावेळी खा.नेते यांनी दिले.

यावेळी तहसीलदार उषा चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, कृषी पर्यवेक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे काम कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक युद्धपातळीवर करीत असल्याचे तहसीलदार उषा चौधरी यांनी सांगितले. या आढावा बैठकीला भाजपचे नेते प्रा.कादर शेख, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजि.अरविंद नंदुरकर, नगरसेवक मनोज वठे, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुध्दे, युवा नेते साकेत भानारकर, प्रशांत वसाके, पंकज माकोडे, रितेश दाशमवार, भाजयुमो महामंत्री स्वप्निल अलगदेवे, अमित रोकडे, माजी जि.प.सदस्य उमाजी कुथे, माजी पं.स.सदस्य नरेंद्र दुपारे, पवन जयस्वाल, अनिल दोनाडकर, उपसरपंच सदाशिव ठाकरे तसेच भाजपा कार्यालय प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा.संजय लांबे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.