सिरोंचात राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आयोजित रोजगार मेळाव्याला महिलांची गर्दी

निर्णय तुमचा, सहकार्य आमचे- भाग्यश्री आत्राम

सिरोंचा : जिल्हा कौशल्य विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील कुशल, अकुशल युवा वर्गासाठी ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन करताना रोजगार, स्वयंरोजगारासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

स्नेहधर्म सभागृहात घेतलेल्या या मेळाव्यात सिरोंचा तालुक्यातील दहावी, बारावी, पदवीधर, डिप्लोमाधारक, आयटीआय उत्तीर्णांसह मोठ्या संख्येने बेरोजगार युवक-युवती उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाच्या वतीने हेमंत मेश्राम यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले. त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि जिल्हा कौशल्य विकास योजनेअंतर्गत आपल्याला कसा लाभ घेता येतो यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रंजित गागापुरपू यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, युवती राकाँच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, महिला तालुका अध्यक्ष मनीषा चल्लावार, नगरसेविका सपना सम्मय्या तोकला, उपसरपंच नागराजू गणपती, रा.यु. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम.डी.शानू, रवी कारसपल्ली, रवी सुलतान आणि रा.काँ.पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.