गडचिरोली : जिल्ह्यातील व्यापारनगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज येथे हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध, ख्रिश्चन, सिंधी असे सर्वधर्मिय, सर्वजातीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. हे लोक आपआपले सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. यावर्षीच्या ईद-ए-मिलादुन्नबी आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आल्याने गणपती विसर्जनासह ईदची मिरवणूकही निघाली. पण धार्मिक सलोख्याच्या वातावरणामुळे दोन्ही धर्माच्या मिरवणुका शांततेच्या वातावरणात पार पडल्या. एवढेच नाही तर काही मुस्लिम बांधवांनी गणपतीच्या मिरवणुकीसाठी सहकार्य करून बंधुभाव जपला. आमदार कृष्णा गजबे यांनीही दोन्ही समाजाच्या लोकांना शुभेच्छा देऊन सामाजिक सलोख्याचे हे वातावरण नेहमी कायम राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
गणपती विसर्जन आणि ईदची मिरवणूक एकाच दिवशी होणार असल्याने देसाईगंजच्या जाणकारांनी सर्वप्रथम ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्याचा निर्णय घेतला. ईदची मिरवणूक आधी काढल्यानंतर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरूवात झाली. त्यामुळे आधी हुजूरांच्या जल्लोषानंतर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने व्यापारनगरी दुमदुमून गेली होती.
मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सय्यद आबिद अली यांच्या मार्गदर्शनाखाली ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवाचे पहिले ध्वजारोहण (ध्वज बांधणे) येथील मदिना मशिदीत इमाम मौलाना कफील अहमद नुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हाजी अब्दुल गनी, अब्दुल खलील खान, हाजी अब्दुल रौफ, शहजाद छोला, नजीर शेख उपस्थित होते. मदिना मशीद मैदानात जमलेल्या नागरिकांची गर्दी मिरवणुकीने किडवाई चौक, बाजार चौक, धर्मापुरी वॉर्डमार्गे देसाईगंज येथील मुख्य जामा मशीद संकुलात गोळा झाली. तिथे मौलाना असमत सुभानी यांनी मुख्य जामा मशिदीचा झेंडा बांधून त्यांना मार्गदर्शन केले. हजरत पैगंबर साहेब यांच्या चरित्रावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
२९ मंडळांच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
देसाईगंजमध्ये २९ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यात मुख्यत्वे फव्वारा चौक, साई मंदिर, अष्टविनायक मंडळ आणि सिंधी कॅालनी अशा चार मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या लक्षवेधी होत्या. नैनपूरच्या तलावात विसर्जन झाले. ईद आणि गणेशोत्सव एकाचवेळी आल्याने देसाईगंज शहरात ठिकठिकाणी लायटिंगचा झगमगाट होता.
माजी न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, किशन नागदेवे, छत्रपती शिवाजी क्लबचे सागर वाढई, जावेद गणी शेख, रामदास मसराम यांनी मिरवणुकांसाठी नास्ता, बिस्किट, पाण्याची व्यवस्था केली होती. पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बंदोबस्त सांभाळला.