गोसेखुर्दच्या विसर्गाचा गडचिरोली जिल्ह्याला फटका, सात मार्ग वाहतुकीसाठी बंद

देसाईगंज तालुक्यात नागरिकांना हलविले

गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसोबत काही उपनद्यांनाही पूर आला आहे. पुराचे पाणी ठेंगण्या पुलांवरून वाहात असल्यामुळे सात मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 C हा मुख्य मार्ग अनेक ठिकाणी ठप्प झाला आहे. गडचिरोली ते आरमोरी, गडचिरोली ते चामोर्शी, चामोर्शी ते आष्टी, मोयाबीनपेठा ते वटरा, वडसा वळण रस्ता, भेंडाळा-गणपूर बोरी, शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-रामाळा- घारगांव-दोडकुली-हरणघाट हे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

काही वाहनधारक पुराच्या पाण्यातूनही वाहन काढण्याचा धोकादायक प्रयत्न करत आहेत. पुराचे पाणी देसाईगंज शहरालगतच्या सावंगी, हनुमान वॅार्डमध्ये शिरले आहे. त्यामुळे दिडशेपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क राहून सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवत आहे.