सकस आहाराचे महत्व सांगण्यासाठी आज गडचिरोलीत ‘रानभाजी महोत्सव’

शेतकरी व महिला बचत गटांचा सहभाग

गडचिरोली : मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील, तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. त्याचा परिचय नागरिकांना व्हावा आणि त्यांचे महत्व कळावे यासाठी गडचिरोलीत आज शुक्रवारी रानभाजी महोत्सव होणार आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने हा रानभाजी महोत्सव कृषि चिकित्सालयाच्या प्रांगणात होणार आहे.

रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके / बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाहीत. त्यामुळे त्या पुर्णपणे नैसर्गिक राहतात. त्यामुळे रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरी भागातील नागरीकांना होण्यासाठी, तसेच विक्री व्यवस्था करून विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थीक फायदा होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

सकाळी 11 वाजता कृषि चिकित्सालय, फळ रोपवाटिका, सोनापूर, जि.गडचिरोली येथे होणाऱ्या या रानभाजी महोत्सवात विविध प्रकारचे 50 स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने महिला बचत गट / शेतकरी बचत गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी कळविले.
(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)