केंद्रीय अर्थसंकल्पावर गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय मंडळींना काय वाटते?

सत्तापक्षाकडून स्वागत, विरोधकांची टिका

गडचिरोली : केंद्रात सत्तारूढ सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचे जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्यांनी स्वागत केले. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टिका करत त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचे सांगितले.

सर्वसामान्यांचे हित जपणारा अर्थसंकल्प- ना.धर्मरावबाबा आत्राम

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्र, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, नव्याने आयआयटी व आयआयएमची स्थापना, महिलांकरीता निःशुल्क कॅन्सर लसीकरण, १ कोटी घरांना सौर उपकरणांचे वितरण, १ कोटी गरीबांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरीता योजना, गरिबांसाठी २ कोटी घरे, तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्यमान योजनेचा लाभ, रेल्वे प्रवास सुखकर, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल, नॅनो युरीयानंतर नॅनो डीएपी खत वापरण्यावर भर आदी अनेक सुधारणा अर्थसंकल्पात दिसत आहेत. पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हीत जपणारा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

नियोजनबद्ध विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – खा.अशोक नेते

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केले. देशाच्या सर्व समाजघटकांच्या आणि सर्व क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून पुढील काळात देशाच्या विकासाची दिशा स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गेल्या साडेनऊ वर्षात केंद्र सरकारने विविध क्षेत्रांच्या उन्नतीसाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. त्यात आता सौरउर्जेचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये दिले. त्यामुळे सौरउर्जेची महागडी उपकरणे केंद्र सरकारच्या सबसिडीतून नागरिकांच्या घरांवर लागून त्यांचा वीज बिलाचा खर्च बराच कमी होईल. सरकारच्या दूरदृष्टीमुळे युवा वर्ग, महिला, शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. हा विद्यमान सरकारचा अंतरिम बजेट असला तरी पुन्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारच सत्तेवर येऊन नव्या उमेदीने पुन्हा देशाच्या विकासाला उभारी देणारा अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वासही खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.

विकसित भारताची गॅरंटी देणारा अर्थसंकल्प- आ.कृष्णा गजबे

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताचा संकल्प असलेला शेतकरी, महिला, सामान्य नागरिक, देशातील २ कोटी नागरिकांना पुढील ५ वर्षात घर उपलब्ध करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा, आणि विकसित भारताची गॅरंटी देणारा वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी भावना आ.कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

खोटे आश्वासन दाखविणारा अर्थसंकल्प- डॉ.नामदेव किरसान

केंद्र सरकारने मागील 10 वर्षाच्या कारकिर्दीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. नागरिकांचे उत्पन्न वाढवले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. जनतेच्या उत्पन्नात फक्त 1 टक्के वाढ झाली. महागाई-बेरोजगारी कमी झाली नाही. या अर्थसंकल्पाने कमी होईल असेही आता वाटत नाही. अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आलेली आहे. श्रीमंतांच्या व उद्योगपतींच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याआधारावर देशाची अर्थव्यवस्था गणली जात असेल तर ते धोकादायक आहे.
सरकार वास्तविकता लपवून अर्थव्यवस्था बळकट असल्याचे आणि ती आणखी बळकट होण्याचे स्वप्न दाखवीत आहे. एकंदरीत बजेट वास्तविकतेला धरून नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॅा.नामदेव किरसान यांनी व्यक्त केली.