मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीकर युवकांची धाव, पोलिसांचा पुढाकार

प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली संधी

गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता पोलिसांकडून कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून जिल्ह्यातील 25 युवक-युवती आणि पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मुंबईच्या टाटा मॅरेथॅानमध्ये सहभाग नोंदवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोलीचे नाव पोहोचवले. विशेष म्हणजे 21 किमी गटात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांनीही सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला.

टाटा मॅरेथॉनमधील 42 कि.मी (फुल मॅरेथॉन), 21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन) आणि 10 कि.मी. मॅरेथॉनमध्ये देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय मॅरेथॅानपटू सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सदर मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी 64 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 25 युवक-युवतींची निवड करुन गडचिरोली पोलीस दलातर्फे त्यांना मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहित्य वाटप करण्यात आले. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य सरावाचे नियोजन करुन दोन महिन्यांचे निवासी प्रशिक्षणही पोलीस मुख्यालयात देण्यात आले.

या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींची शारीरिक क्षमता वाढविण्याकरीता कसून सराव घेण्यात आला. यामध्ये 21 किमी, 25 किमी, 35 किमी व 42 किमी. धावणे, स्ट्रेन्थनिंग एक्सरसाईज, एबीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज इ. शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी मार्गदर्शन केले.

21 किमी. गटात गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, उपनिरीक्षक विश्वंबर कराळे, उपनिरीक्षक ईश्वर सुरवासे, अविनाश कांदो, उमेश मट्टामी, मुकेश रापंजी, नयन गुरनुले, सौरभ कन्नाके, प्रमोद पुराम, राकेश तुलावी, सादु कांदो, ओंकार दर्रो, स्वप्निल गुरनुले, अमित कावळे, सुरज बोटरे, अमोल मडावी, तुषार गावतुरे, श्रेयस वाढई तसेच अमोल पोरटे (42 किमीमध्ये 3 तास, 24 मी.) आणि 21 किमी या गटात पोअं/214 लिलाधर खरबनकर, रोहन भुरसे (21 किमी 1 तास, 19 मी.), प्रियंका ओक्सा (21 किमी अंतर 1 तास, 28 मी.) तसेच साक्षी पोलोजवार (21 किमी अंतर 1 तास, 45 मी.), पोअं नाजूक मोहुर्ले (10 किमी अंतर 39 मी. 13 सेकंद) यांनी सहभाग नोंदविला.