रासेयोचे शिबिरातून श्रमसंस्कार, निस्वार्थपणे सेवा हीच खरी सेवा

अतुल गण्यारपवार यांचे प्रतिपादन

चामोर्शी : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शीद्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर वाकडी (जुनी) येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर म्हणजे वि‌द्यार्थ्यांना सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठीच या शिबिराचे आयोजन असते. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यामध्ये श्रमसंस्कार रुजविणे व समाजाची निस्वार्थ सेवा हीच खरी सेवा, हा संकल्प मनात धरून शिबिरार्थ्यांनी मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन गण्यारपवार यांनी केले.

उद्‌घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे प्रा.डॉ.हेमराज निखाडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे रा.से.यो.विभागीय समन्वयक प्रा.डॉ.पवन नाईक, तर प्रमुख अतिथी म्हणून भाग्यश्री मंगर (सरपंच वाकडी), अंतकला मडावी (उपसरपंच) गिता रायसिडाम (सरपंच चाकलपेठ), नामदेव किनेकर (संचालक, चामोर्शी खरेदी विक्री संघ) महाविद्यालयाच्या प्राचार्य शिल्पा काशट्टीवार, सुनील बारसागडे, पुनेश्वर मडावी, अनिल कुकडे, प्रियंका तांदुळकर, राणी गोहणे, मुखरु तांदुळूकर, देवाजी काकडे, वैशाली पाल, वंदना काकडे, भुदेवपा मंगर, देवराव कुमरे, रेश्मा ठुसे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उद्‌घाटनपर भाषणातून प्रा.डॉ.हेमराज निखाडे यांनी जागतिकीकरणाच्या झंझावातात लोप पावत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वाची आहे, असे विचार व्यक्त केले. प्रा.डॉ.पवन नाईक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल संस्कृतीकडून वारकरी परंपरेकडे जायला हवे असे मत व्यक्त केले.

हे श्रमसंस्कार शिबिर रासेयोचे कार्यक्रम आधिकारी प्रा.नोमेश्वर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नितेश सावसागडे, प्रास्ताविक प्राचार्य शिल्पा काशट्टीवार यांनी तर आभार प्रा.कृणाल आंबोरकर यांनी मानले.