अन् काही क्षणात धगधगत नष्ट झाला लाखो रुपयांचा गांजा

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलिसांनी कृती

गडचिरोली : जिल्ह्यात अलिकडे करण्यात आलेल्या ५ कारवायांमध्ये तब्बल ९० किलो ७१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. तो सर्व गांजा सोमवारी (दि.२६) अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पोलिसांनी नष्ट केला. त्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितले जाते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने ४ पोलीस स्टेशनमधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या ५ गुन्हयातील जप्त मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करुन जाळून नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक तथा समितीचे अध्यक्ष नीलोत्पल, सदस्य अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, प्रभारी पोलीस उपधीक्षक प्रमोद बानबले, एलसीबीचे प्रभारी उल्हास भुसारी, वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथील अधिकारी, वजन मापे निरीक्षक आणि पंचांच्या साक्षीने करण्यात आली.

यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनिरीक्षक दीपक कुंभारे, हवालदार नरेश सहारे, नायक राकेश सोनटक्के, शुक्रचारी गवई, दीपक लेनगुरे, शिपाई माणिक दुधबळे, सचिन घुबडे, मंगेश राऊत, माणिक निसार, मनोहर टोगरवार, फोटोग्राफर देवेंद्र पिद्दुरकर, पंकज भगत यांनी सहकार्य केले.