गडचिरोलीतील स्त्री शक्ती समाधान शिबिरात २०० वर महिलांनी मांडल्या समस्या

१५ समस्यांचे तत्काळ निवारण, योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, तसेच महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी गडचिरोलीत अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३४५ महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात २०० वर महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यातील १५ समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात आले.

चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार डॅा.देवराव होळी यांनी केले. विशेष अतिथी म्हणून परिविक्षाधीन आयएएस अधिकारी राहुल मीणा यांनी उपस्थित राहून महिलांना त्यांच्याकरिता असलेल्या शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी केले.

महिलांनी त्यांच्याकरिता असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही विभागाच्या योजनेबाबत काही समस्या असल्यास त्याबद्दल विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावे, असे डॅा.होळी यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) ज्योती कडू, माजी नगरसेविका प्रतिभा चौधरी, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, पशुधन विकास अधिकारी ए.पी. काळे, तालुका कृषी अधिकारी नेहा पवार, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी, बाल विकास प्रकल्प अधिकारी एन.आर.परांडे, कृषी अधिकारी पी.पी.पदा, तसेच इतर विभागातील तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन जि.प. प्राथमिक शाळा दिभनाच्या मुख्याध्यापिका भारती शिवणकर यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (शिक्षण) यु.एन.राऊत यांनी केले.