आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन्मानित

बेस्ट मोबाईल अॅप, बेस्ट ईन्वेस्टमेंट

गडचिरोली : बँकिंग फ्रंटीअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यात आर्थिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षात गडचिरोली जिल्हा बँकेने ‘बेस्ट मोबाईल अॅप’ व ‘बेस्ट ईन्वेस्टमेंट’ यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोवा येथे झालेल्या नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकिंग समिटमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. गोव्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, लेखा विभागाचे सरव्यवस्थापक संजय अलमपटलावार व माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपसरव्यवस्थापक हर्षवर्धन भडके यांनी सदर दोन पुरस्कार स्विकारले.

यावेळी मार्गदर्शन करताना सहकारमंत्री शिरोडकर यांनी देशातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषी सहकारी संस्था यांचे देशाच्या आर्थिक उन्नतीत महत्वाचे योगदान असून सहकार क्षेत्रामुळे, त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे तळागाळातील लोकांना बँकिंग सुविधेचा लाभ होत असल्याचे सांगितले.

बँकेच्या या सन्मानात शेतकरी वर्ग, बँकेचे खातेदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेही योगदान असल्याचे सांगत बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची सुविधा देण्याचे दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेच्या ग्राहकांकरीता सन २०१८ मध्ये मोबाईल बँकिंग सुविधा सुरु करण्यात आली. त्यामार्फत १७ हजार ५०० खातेदार मोबाईल बँकींग सुविधेचा लाभ घेत आहेत. तसेच युपीआय व्यवहाराव्दारे रोज १८ ते २० हजार व्यवहार बँकेचे खातेदार करीत आहेत. त्याचप्रमाणे बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा व केलेल्या कामकाजाची प्रगती याबाबत नॅशनल को-ऑपरेटीव्ह समितीने सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे बँकेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वैकुंठ मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँको ब्ल्यू रिबन या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.