ज्येष्ठ पत्रकार अरविंद खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथे निधन

अनेक दिवसांपासून सुरू होते उपचार

गडचिरोली : दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी आणि गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असणारे ज्येष्ठ पत्रकार अरविंद खोब्रागडे यांचे गुरूवारी (दि.९) दीर्घ आजाराने निधन झाले. यामुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

जवळपास एक वर्षापूर्वी पोटविकारामुळे ते त्रस्त होते. नागपूरमध्ये त्यांच्यावर शस्रक्रिया झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. पण तीन महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना त्रास जाणवायला लागल्याने नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

अहेरी येथे जनवाद वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेची सुरूवात करणाऱ्या अरविंद यांनी गडचिरोलीत देशोन्नती, सकाळ, नवभारत आणि नवराष्ट्र या दैनिकात जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संवेदनशिल आणि अभ्यासू पत्रकार आणि मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व वर्गासोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वेळा जबाबदारी सांभाळली आहे.

ना.धर्मरावबाबा आत्राम, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता चंद्रपूर मार्गावरील डोंगरे पेट्रोल पंपामागील निवासस्थानावरून निघणार आहे.