रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा

खा.अशोक नेते यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश

गोंदिया : जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. विविध कारणांमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता संबंधित विभागांनी रस्ता सुरक्षेसंबंधी सर्वतोपरी प्रयत्न करावे,असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.

याप्रसंगी रस्ते अपघाताचा आढावा घेऊन रस्त्यांवर दिशादर्शक/माहितीदर्शक फलक लावणे, गतिरोधक (स्पिडब्रेकर), रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, रस्ता सुरक्षा जनजागृती अशा विविध विषयांवर चर्चा करून काय उपाययोजना केल्या जाईल यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये अपघात होण्यामध्ये ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालविणे, ट्रिबल सीट, हेल्मेट न वापरणे, राँग साईड गाडी चालविणे, दारु पिऊन गाडी चालविणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे, रस्त्यांवर जनावरे असणे, लहान मुलांनी गाडी चालविणे अशा विविध कारणांनी अपघात होतात. यावर उपाययोजना करून कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी खा.नेते यांनी दिले.

याप्रसंगी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, गोंदिया जि.प‌.चे अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंपळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिवहन अधिकारी राजेश करपे, आमदार विनोद अग्रवाल, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंग येरणे, गजेंद्र फुंडे, परसराम फुंडे, आदित्य शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा समितीची बैठक सुरू होण्याअगोदर खासदार सुनील मेंढे व जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.