गोंडवाना विद्यापीठातील अल्फा अकॅडमीतून होणार बेरोजगारांच्या नोकरीचा मार्ग प्रशस्त

विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, तीन महिन्यांची इंटर्नशिप आणि मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट

गडचिरोली : माहिती तंत्रज्ञानाचा आवाका आता सेवाक्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नसून चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही याचा वापर सर्रास होऊ लागला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राशी निगडित कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत होऊन त्यांच्या नोकरीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने अल्फा अकॅडमी सुरु केली. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राबविल्या जात असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या पुढाकाराने गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी या अल्फा अकादमी प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. संगणकीय कोडींगसारखे तुलनेने अवघड कौशल्य आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. पण संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे, संगणकावर एखादा प्रोग्राम इन्स्टॉल करणे असे सामान्य कौशल्य आत्मसात असणाऱ्यांचीही संख्या जिल्ह्यात पुरेशी नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अभियांत्रिकी, क्वांटम संगणक आणि इतर अनेक क्षेत्रातील आय टी क्षेत्राशी निगडित कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी अल्फा अकादमी प्रकल्पातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार झाला. गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रम शि्कवण्यासह मास्टर ट्रेनर तयार करण्यासाठी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी अल्फा अकॅडमीत प्रशिक्षण दिले जात आहे.

आजच्या स्थितीत ५०० विद्यार्थ्यांना यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाने नास्कॉम (NASSCOM) द्वारा मान्यताप्राप्त प्रशिक्षक लर्नकोचची निवड केली आहे. विविध प्रोग्रामिंग भाषेचे तंत्रज्ञान विद्यार्थी शिकत आहेत. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिप असेल आणि निवडलेले विद्यार्थी आयटी कंपन्यांमध्ये काम करू शकतील. मोठ्या कंपन्यांमध्ये तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप आणि त्यानंतर अश्याच मोठ्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळू शकेल.

या अभ्यासक्रमाला कोण घेऊ शकेल प्रवेश?
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, तसेच गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही हे प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र असतील. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे आणि येथील आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास पुरेसे नाही. त्यामुळेच डिजिटल कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.