राज्यातील डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र ‘श्रमिक पत्रकार’ कक्षेत

मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाचे डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेकडून स्वागत

गडचिरोली : राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॅानिक आणि रेडिओ क्षेत्रातील पत्रकारांना ‘श्रमिक पत्रकार’ या कक्षेत आणण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेने स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आाणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शब्द पाळल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरिय पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आॅनलाईन भाषणात राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना श्रमिक पत्रकारांच्या कक्षेत घेण्याचा शब्द दिला होता. डिजिटल मिडिया क्षेत्राचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

डिजिटल मिडियाला पत्रकारिता माध्यम म्हणून मान्यता देवून सरकार दरबारी नोंदणी व्हावी, मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल मिडियाला नियमित जाहिराती मिळाव्यात, डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाव्यात यासह १६ मागण्या करणारे ठराव अधिवेशनात करण्यात आले होते. त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हेसुद्धा सहभागी झाले होते. राज्यातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडलेल्या त्या अधिवेशनात मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे सुरु झाली आहे. संघटनेचे राज्यातील सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्यावतीने राजा माने यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.