आतिषबाजी, ढोलताशे अन् आदिवासी नृत्यही, विसर्जन मिरवणुकांची पहा व्हिडीओ झलक

तरुणाईच्या जल्लोषात जिल्हाभर गणरायाला निरोप

गडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी अनंत चतुर्दशीला झालेल्या विसर्जनाने सांगता झाली. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होते. मात्र बहुतांश ठिकाणी मोठ्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना संध्याकाळी सुरूवात झाली. आकर्षक आतिषबाजीसोबत डीजे आणि ढोलताशाच्या गजरात तरुणाईच्या उत्साहाला एकच उधान आले होते.

विशेष म्हणजे काही मिरवणुकांमध्ये पारंपरिक वेशभुषेत आदिवासी महिला-पुरूष नृत्य करीत सहभागी झाले होते. विसर्जनासाठी गोकुळनगरच्या तलावावर गर्दी होऊ नये यासाठी नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा चोख बंदोबस्त होता. घरगुती गणेशमुर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी स्थानिक मच्छीमार बांधव मदत करताना दिसत होते.

गडचिरोली शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्याकडील गणपतीचे पालखीने तलावावर आगमन झाल्यानंतर पुजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, गडचिरोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे हे जातीने हजर राहून विसर्जन मिरवणुकांवर लक्ष ठेवून होते.