अन् संतापलेली हत्तीण त्यांच्या बाईकला फुटबॅाल बनवून खेळली

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

गडचिरोली : सर्कसीत फुटबॅाल खेळणारा हत्ती अनेकांनी पाहिला असेल. पण वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील एका हत्तीणीने रस्ता ओलांडताना रस्त्यात दिसलेल्या बाईकलाच फुटबॅाल बनवून सोंडने ढकलत बाजुला करून आपला मार्ग मोकळा केला. हा प्रकार अहेरी तालुक्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पजवळ शनिवारी संध्याकाळी घडला. यावेळी त्या बाईकवरील युवक थोडक्यात बचावले. पण त्यांनी कॅमेरात कैद केलेला तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, छल्लेवाडा येथील दोन युवक कमलापूर हत्ती कॅम्पच्या परिसरातील तलावाजवळच्या रस्त्यावर आपली बाईक ठेवून जवळच लघुशंकेसाठी थांबले होते. तेवढ्यात हत्ती कॅम्पमधील मंगला ही हत्तीण रस्ता ओलांडून पलिकडे जाण्यासाठी आली. त्या तरुणांनी हातवारे करत मंगलाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. हा प्रकार मंगलाला आवडला नाही. त्याचवेळी तिच्या मार्गात आडवी उभी असलेली त्या तरुणांची बाईक पाहून मंगलाचे डोके आणखी गरम झाले. तिने त्या बाईकला सोंडेने फुटबॅालप्रमाणे ढकलत रस्त्याच्या दुसऱ्या बाजुकडे नेऊन आपला मार्ग मोकळा केला. यात त्या बाईकचे मात्र चांगलेच हाल झाले.

वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.भोयर यांनी या घटनेला दुजोरा दिला. पण त्या बाईकच्या नुकसानीसाठी शासनाकडून कोणती नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता नाकारली.