19 फर्निचर मार्टमध्ये आढळले 8 लाखांचे अवैध सागवान लाकूड

सिरोंचा वनविभागाची छापेमारी, सर्वांचे परवाने रद्द

सिरोंचा : जंगलातील लाकडांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सिरोंचा तालुक्यात आसरअली परिक्षेत्रातील १९ फर्निचर मार्टवर वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी छापे मारले. यात त्यांच्याकडे जवळपास आठ लाख रुपये किमतीचे अनधिकृत सागवान लाकूड आढळले. त्यामुळे त्या सर्वांचे परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ही कारवाई सिरोंचाचे उपविभागीय वनाधिकारी पी.डी.बुधनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

आसरअली परिसरात जंगलातील सागवान वृक्षांची अवैधपणे कटाई करून त्यांची फर्निचर मार्टच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय वनाधिकारी बुधनकर यांनी पथके तयार करून आसरअली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा, कंबलपेठा या गावात असलेल्या सर्व 19 फर्नीचर मार्टवर एकाच वेळी छापे मारले. त्यात मोठया प्रमाणात अवैध रित्या साग सिलपाट, साग कटसाईज फर्नीचर आढळून आले. त्याची किंमत 7,51,594 रुपये, तसेच बेवारसपणे 34,311 रुपयांचे लाकूड असा एकुण 7,85,905 रुपये किमतीचा माल जप्त करुन आसरअली परिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आला. संबंधित फर्नीचर मार्ट मालकांविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला. या सर्व फर्नीचर मार्ट धारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.

ही कारवाई उपविभागीय वनअधिकारी पी.डी. बुधनवर यांच्यासह बामणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी. झाडे व त्यांची चमू, झिंगानूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी.बारसागडे व त्यांची चमू, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रनिघ) एन.टी. चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) पी.एम.पाझारे, देचली परिक्षेत्रातील वनकर्मचारी अशा एकूण 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून केली.

या फर्निचर मार्टचा समावेश
अवैध सागवान लाकूड जप्त करण्यात आलेल्या फर्निचर मार्टमध्ये 1) जय श्रीराम फर्निचर मार्ट, आसरअली (रविंद्र मिनाबाबू कासोजी ) 2) महालक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअली (संतोष सांबय्या गोत्तुरी) 3) लक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअली (समय्या पोचालू गंप्पा) 4) त्रिमुर्ती फर्नीचर मार्ट, जंगलपल्ली (देवेद्र लच्चन्ना गोत्तुरी) 5) बालाजी फर्नीचर मार्ट, आसरअली (किशोर शंकर कोरटला) 6) ओम श्रीविराट फर्नीचर मार्ट, जंगलपल्ली (राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी) 7) गंगापुत्रा फर्नीचर मार्ट, आसरअली (राजकुमार समय्या पोटे) 8) भार्गवचारी फर्नीचर मार्ट, अंकिसा (सुरेश चंद्रय्या अरिंदा) यांचा समावेश आहे.

कुंपनच खात होते शेत
सदर माल जप्त करताना झालेल्या प्राथमिक चौकशीमध्ये आसरअलीच्या क्षेत्र सहायकाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. मिळालेला अवैध माल हा आसरअली लगतच्या वनविकास महामंडळाच्या (FDCM)साग रोपवनातील, तसेच प्रादेशिक जंगलातील आहे. या जागांची तपासणी सुरु आहे. अवैध सागवान तोडीमधील गुन्हेगार सराईत असून वनविभागातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, गावातील लोकांकडून माहिती देण्यास असहकार्य करणे, यासारख्या बाबींमुळे वनविभागास अडचणी येत आहेत. असे असले तरीही सदर गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन अवैध सागवान तोडीला आळा बसविण्याचा पूर्ण प्रयत्न सिरोंचा वनविभाग करणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी कळविले.