शुक्रवारच्या पावसाने पुन्हा दाणादाण, जिल्ह्यातील 24 मार्ग झाले बंद

शनिवारी शाळा-कॅालेजला सुटी

नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग असे बंद होते.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा कहर सुरू आहे. शुक्रवारसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिल्याने पाऊस उसंत घेईल असे वाटत असताना सकाळी ९ वाजतापासून पुन्हा पावसाने जोर पकडला. त्यामुळे शुक्रवारचा येलो अलर्ट रेड अलर्टमध्ये बदलविण्यात आला. शनिवारसाठी आॅरेंट अलर्ट कायम आहे. संभाव्य पूरस्थिती पाहता जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सर्व अंगणवाड्या, शाळा-महाविद्यालयांना शनिवारी सुटी जाहीर केली आहे.

शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे पुन्हा नदी-नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी रस्त्यावरून, पुलांवरून वाहू लागल्याने जिल्हाभरात 24 मार्गांवरील वाहतूक थांबलेली आहे. त्यात काही राष्ट्रीय महामार्गांचाही समावेश आहे. गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. भामरागड येथील पर्लकोटा नदीचे पाणी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पुलावर चढलेले नव्हते. परंतू आलापल्ली ते भामरागडदरम्यान असलेल्या नाल्यांना पूर असल्यामुळे वाहतूक बंद होती. रात्री वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने आष्टीजवळील पूल पाण्याखाली जाऊन आष्टी ते गोंडपिपरी मार्ग बंद झाला.

दरम्यान शुक्रवारच्या पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेच्या इमारतीला बेटाचे स्वरूप आले होते. खोलगट भागात असलेल्या या इमारतीच्या सभोवताल तळे साचल्यामुळे त्यातून वाट काढताना नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही कसरत करावी लागली.

हे मार्ग झाले वाहतुकीसाठी बंद

सिडकोंडा-झिंगानूर (स्थानिक नाला), कोत्तापल्ली र.-पोचमपल्ली (स्थानिक नाला), आसरअली-मुतापुर-सोमनूर (स्थानिक नाला), मौशीखांब -अमिर्झा (स्थानिक नाला), साखरा -चुरचूरा (स्थानिक नाला), कुंभी-चांदाळा (स्थानिक नाला), रानमूल -माडेमूल (स्थानिक नाला), आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (कासरपल्ली नाला), कान्होली -बोरी-गणपूर (कळमगाव नाला), चामोर्शी- कळमगांव (स्थानिक नाला), चांभार्डा-अमिर्झा (पाल नाला, हरणघाट-चामोर्शी (दहेगाव नाला), तळोधी-आमगाव-एटापल्ली (स्थानिक नाला), कोनसरी-जामगिरी (स्थानिक नाला), आलापल्ली -भामरागड (बांडीया नदी, कुडकेली नाला, बिनागुंडा नाला, गुंडेनूर नाला व पेरमिली नाला), चामोर्शी-आष्टी (जामगिरी, येणापूर, सोनापूर नाला), कोपरअल्ली- मुलचेरा (दिना नदी), अहेरी-मोयाबिनपेठा-वटरा (वटरा नाला), चामोर्शी -हरणघाट (दहेगांव नाला), कोनसरी जामगिरी (रेशीमपूर नाला, मारोडा नाला), सावेला -कोसमघाट-रायपूर (स्थानिक नाला), राजोली-मारदा (स्थानिक नाला), पोटेगाव ते राजोली (स्थानिक नाला), आणि आष्टी – गोंडपिपरी (वैनगंगा नदी)