अहेरीत शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह न्यायमूर्तींची उपस्थिती

याच इमारतीमधून नवीन न्यायालयाचे कामकाज चालणार आहे

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमधील नागरिकांची न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची सुरूवात होत आहे. या न्यायालयाचे उद्घाटन शनिवार दि.२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि न्या.भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याशिवाय सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे उभारण्यात आलेल्या उपपोलिस स्टेसनच्या इमारतीचे उद्घाटन ना.फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने झिंगानूर येथे पोलीस विभागाच्या वतीने जनजागरण मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा संध्याकाळपर्यंत प्रशासनाकडे आला नसल्याचे समजते.

अहेरी येथे सुरू होत असलेले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अनेक दिवसांच्या मागणीचा परिपाक आहे. अधिवक्ता महासंघाने अनेक वर्षांपासून यासंदर्भातील मागणी लावून धरली होती. तत्कालीन पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यकाळात ही मागणी पूर्णत्वास आली. दक्षिण गडचिरोलीकडच्या दुर्गम भागातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही कसरत आता वाचणार आहे.