आगीत घर जळून खाक, लक्ष्मीपूरच्या दुर्गम परिवाराला तलाठ्याकडून मदत

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत आदिमुत्तापूरअंतर्गत लक्ष्मीपूर येथील समय्या मलय्या दुर्गम व हनुमंतू मलय्या दुर्गम यांच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले. यात जीवनावश्यक वस्तु व पैसे, आधार कार्ड, पास बुक व आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जळाली.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विनोद कावटी हे घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन घेऊन दाखल झाले. जळालेल्या दोन्ही घराच्या आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर लक्ष्मीपूर गावाचे तलाठी विनोद कावटी यांनी कुटुंबाची भेट घेवून कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुसह आर्थिक मदत केली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचे सांगत कुटुंबाला धीर दिला.

यावेळी आदिमूत्तपूर ग्रामपंचायतचे सरपंच मंजू रामेन्द्रम चेदम, सचिव मनोज बघेल, सदस्य नामदेव गंपला, सदस्य श्रीनिवास कुम्मरी, नंदिगांव गावातील पोलीस पाटील अशोक कुम्मरी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.