दारू तस्करांची पोळ्यासाठी लगबग, आष्टीत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाठलाग करून पकडले वाहन, चालक पळाला

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या मार्गाने दारुची आयात आणि विक्री केली जाते. पोळ्याच्या सणाला दारूविक्रीत मोठी वाढ होते. त्यामुळे तस्करांची लगबग सुरू असताना आष्टी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूच्या पेट्यांनी भरलेल्या वाहनाला जप्त केले. या कारवाईत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आष्टी पोलिसांनी मार्कंडा कंसोबा फाटा येथे नाकाबंदी केली होती. त्यावेळी गोंडपिपरी कडून आष्टीकडे येत असलेल्या बोलेरो पिकअप (एमएच 30, ए बी 2602) या वाहनास पोलिस पथकाने थांबण्याचा ईशारा केला. परंतू वाहन चालकाने वाहन न थांबविता आलापल्ली मार्गाने सरळ निघून गेला. पोलिस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला असता चालक चंदनखेडी (वन) येथील रस्त्यावर वाहन उभे करुन जंगलात पळून गेला. त्या वाहनात 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे दारूचे बॅाक्स आणि 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.

सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचा क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहनाच्या चेसिस नंबरवरून वाहन मालकाचा शोध घेतला जाणार आहे. त्या चालक आणि मालकाविरूद्ध कलम 465 भादंवि, सहकलम 65 (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मानकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे प्रभारी अधिकारी कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.