गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 मार्च 2025 रोजी गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनात महाराष्ट्रातील युवा साहित्यिक सहभागी होतील. परिसंवाद, कवीसंमेलन, नाट्यप्रयोग, शायरी, गझल मुशायरा आणि संगीत कार्यक्रम असे या संमेलनाचे स्वरूप राहणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन आणि ग्रंथदिंडी
युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन 5 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात होणार आहे. यापूर्वी गडचिरोली शहरात ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. युवा साहित्यिक अक्षय चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा अभिनेते हर्षल पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश आमटे राहणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, सहस्वागताध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे असतील. उद्घाटनप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण उपस्थित राहतील.
परिसंवाद, कवीसंमेलन आणि नाट्यप्रयोग
दोन दिवसीय संमेलनात विविध चर्चासत्र, परिसंवाद, कवीसंमेलन, नाट्यप्रयोग, शायरी आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आधुनिक तंत्रज्ञान व मराठी भाषा आणि साहित्य संमेलने’ तसेच ‘वर्तमानाचा वेध’ यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहे. ‘वाचायचे का? काय? कसे?’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अमृत बंग राहतील. दुपारी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. त्याचे अध्यक्षपद मुंबईचे कवी जितेंद्र लाड सांभाळतील. संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्रभर गाजत असलेले जळगावचे ‘नली’ हा एकल नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
गझल मुशायरा आणि समारोप सोहळा
6 मार्च रोजी विविध परिसंवाद, विद्यार्थ्यांचे कवीसंमेलन आणि गझल मुशायरा होणार आहे. संमेलनाचा समारोप सायंकाळी 4.30 वाजता होणार असून साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी लेखक देविदास सौदागर हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी सुप्रसिद्ध सरोदवादक विजया कांबळे यांच्या सरोद वादनाने संमेलनाची सांगता होईल.
हे संमेलन गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. सर्व साहित्यप्रेमींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले आहे.