– तर गडचिरोलीत शिवसेनेचा वेगळा घरोबा !

जिल्हा नियोजन समितीत डावलल्याने व्यक्त केली तीव्र नाराजी

गडचिरोली : मूळ शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावर स्थान मिळाले नाही. त्यामुळे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर आम्ही भाजपसोबत फारकत घेऊन स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असा इशाराच जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार यांनी दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यापूर्वी ना.एकनाथ शिेंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. मात्र यावेळी नियोजन समितीवर नुकत्याच नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये सर्वच्या सर्व, म्हणजे ११ ही सदस्य हे भाजपचेच पदाधिकारी आहेत. वास्तविक ज्या जिल्ह्यात पालकमंत्री ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचे ६० टक्के आणि युतीतील सहकारी पक्षाचे ४० टक्के सदस्य घ्यायचे असा फाॅर्म्युला ठरलेला होता. त्यानुसार शिवसेनेकडून ४ जणांचे नाव पाठविले होते. परंतू भाजपने गडचिरोलीत शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

यापूर्वी गोंडवाना विद्यापीठातील राज्यपालनियुक्त सिनेट सदस्यत्वासाठीही शिवसेनेकडून २ नावे पाठविली असताना तिथेही डावलण्यात आले. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख अमिता मडावी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.