गडचिरोली : नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लॅायड्स मेटल्सच्या कोनसरी प्रकल्पांतर्गत विविध कामांमध्ये वर्ष 2025 मध्ये 5 हजार नवीन लोकांना रोजगार मिळणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे कंपनीच्या आवश्यकतेनुसार विविध कौशल्ये शिकण्यासाठी बऱ्याच स्थानिक लोकांना प्रशिक्षणासाठी ओरिसा, नागपूर व इतर काही ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये पाठविले आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोनसरी प्रकल्पाच्या पेलेट 1 आणि पेलेट 2 युनिट, स्लरी पाईपलाईन, ग्राईंडिंग युनिट आदींमध्ये या नवीन लोकांची भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभाकरण म्हणाले, लोक आमच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी आवश्यक ते कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासही ते तयार आहेत. याशिवाय उच्च दर्जाचे लोहखनिज आमच्याकडे आहे. त्यात भर म्हणून शासनही आम्हाला सहकार्य करत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला आता स्टील हब होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2025 मध्ये लॅायड्सच्या कोनसरी प्रकल्पात 10 मिलेनिअम (10 हजार) टन पेलेट (स्टिल बनविण्यासाठी कच्च्या खनिजाला शुद्ध करून तयार केलेले गोळे) तयार होईल. त्याचा वापर विदर्भातील इतर लोहनिर्मिती प्रकल्पांमध्ये होईल. त्यांना यापूर्वी कच्चे लोहखनिज छत्तीसगड, ओरिसामधून आणावे लागत होते. पण आता शुद्ध केलेल्या स्वरूपात (पेलेट) कोनसरीत उपलब्ध होत असल्याने त्यांना आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणे सोपे जाईल. याशिवाय विदर्भाचा हा परिसर देशाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडून दाक्षिणात्य राज्यांत आणि इतरत्र माल पाठविणे सोपे जाईल. पण या भागात रेल्वेमार्गाचे जाळे विणण्यासाठी सरकारने योग्य ती पाऊले लवकरात लवकर उचलावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने मायनिंग कॅारिडोर रोड तयार करून दिल्यास लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, अशीही अपेक्षा प्रभाकरण यांनी व्यक्त केली.
दोन वर्ष काम करणारे शेअरच्या रूपाने झाले मालक
आपल्या कंपनीत काही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनाही रोजगार दिलेला आहे. आता त्यांच्यासह कंपनीत दोन वर्ष पूर्ण झालेल्या 6 हजार कामगार-कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. या रूपाने ते कंपनीचे भागीदार बनून एका अर्थाने मालक बनतील. म्हणजे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात भेद राहणार नाही, असे प्रभाकरण म्हणाले. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय, शिक्षण यासारख्या चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आता येणाऱ्या जनसुनावणीनंतर आम्हाला आमच्या प्लान्टचा विस्तार करायचा आहे. आम्हाला आणखी जमिनीची गरज आहे. लोकांनी सहकार्य करावे. हा परिसर भविष्यात नवीन जमशेदपूर म्हणून विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास बी.प्रभाकरण यांनी व्यक्त केला.
हेडरी येथील 30 खाटांच्या लॅायड्स काली अम्माल रुग्णालयात वर्षभरात 60 हजार लोकांनी मोफत औषधोपचार घेतले. एवढेच नाही तर तज्ज्ञ डॅाक्टरांकडून अनेक आॅपरेशनही झालेत. आता या रुग्णालयाला 100 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॅास्पिटल करण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय महिला सशक्तिकरण, तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या मदतीने नेट बँकिंग सुविधेचा परिसरातील जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती प्रभाकरण त्यांनी दिली.