जेईई, नीट, सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत मोफत टॅब

५ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

गडचिरोली : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरमार्फत जेईई / नीट / एमएचटी-सीईटीच्या पूर्वतयारीसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ५ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

दहावी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या जेईई / नीट/ एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेता येतो. त्यासाठी विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी याआधी जेईई / नीट / एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत, मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या उमेदवारांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दि.१५ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन देखील महाज्योतीमार्फत करण्यात आल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापकांनी दिली.