महिला रुग्णालयातील मृत्यूंचे कारण गुलदस्त्यात, अहवाल वरिष्ठांकडे सादर

मंत्री, खासदारांनी काय केल्या सूचना, वाचा?

गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसुती झाल्यानंतर प्रकृती बिघडून दगावलेल्या तीन मातांच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल समितीने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे सादर केला आहे. पण त्या अहवालात नेमके काय दडले आहे, हे सांगण्यास जिल्हा शल्य चिकित्सकांनी असमर्थता दर्शविली आहे. दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी खासदार अशोक नेते यांनीही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या रुग्णालयात सुविधांचा, जागेचा आणि मनुष्यबळाचा अभाव ही मोठी समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून स्थितीची माहिती घेतली. यावेळी काही रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, कुठेही हेळसांड होऊ नये अशी सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते आणि प्र.वैद्यकीय अधीक्षक डॅा.माधुरी किलनाके यांना केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी सभापती नाना नाकाडे आदी उपस्थित होते.

खा.अशोक नेते यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंकी आणि डॉ.बागराज धुर्वे यांच्याकडून रुग्णालयातील समस्यांबाबतचा आढावा घेतला. मातांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. रुग्णांना भयमुक्त उपचार मिळावेत, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोळ, माजी.न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष भास्कर भुरे उपस्थित होते.