लोकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांचे गौरवोद्गार

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

गडचिरोली : महाराष्ट्र दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा बुधवार, दि.1 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते झाला. लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीचे विक्रमी 72 टक्के मतदान हे जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शविते. प्रतिकूल परिस्थितीतही मतदानाप्रती असलेला दृढ संकल्प देशभरातील नागरिकांना लोकशाहीची भावना जपण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधीक्षक निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मिना, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी एस.आर.टेंभुर्णे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना, तसेच जिल्ह्यातील शहिदांच्या पावन स्मृतीला जिल्हाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेले आमगावचे तलाठी कोंडीबा चाटे, पोलिस उपनिरीक्षक नथ्याबा बोडरे, पोलिस नायक सर्वश्री रावजी हिचामी, रूषी विडपी, रुपेश म्हशाखेत्री यांचा सत्कार करण्यात आला.

सुरवातीला परेड कमांडर धर्मेंद्र मडावी व सेकंड कमांडर सुरेश मडावी यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. सी-60 कमांडो, महिला पोलिस, पोलिस मुख्यालय, गृहरक्षक दल, बँड, डॉग स्कॉड, बिडीडीएम आदी पथकांनी संचलन करून मानवंदना दिली.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पहा खाली)