महासंस्कृती महोत्सवातील संगीत मैफलीने गडचिरोलीकर रसिक झाले मंत्रमुग्ध

रविवारी बिरसा मुंडा यांच्यावरील महानाट्य

गडचिरोली : सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील एमआयडीसीच्या पटांगणात आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा शुक्रवारी संध्याकाळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या संगीत मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘फुलले रे क्षण माझे, नभ उतरू आलं, तोच चंद्रमा नभात, जांभूळ पिकल्या झाडाखाली…’ आदी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या गाण्यांचा नजराणा पार्श्वगायक ऋषिकेश रानडे व आनंदी जोशी यांनी सादर करून रसिक प्रेक्षकांना तृप्त केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहायक जिल्हाधिकारी ओंकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हावासियांना या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक मेजवानी मिळाली आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे, या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयुषी सिंह यांनी यावेळी केले.

रविवारी महानाट्य, तर सोमवारी हास्यजत्रा

17 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोककलेचा’ याअंतर्गत दंडार, गोंधळ, रेला नृत्याचे सादरीकरण झाले. तसेच मेघा घाडगे व सहकलाकारांनी लावणी सादर केल्या. रविवार दि.18 फेब्रुवारी रोजी ‘बिरसा मुंडा यांची जीवनगाथा’ या महानाट्याचे सादरीकरण होईल. दि.19 रोजी समीर चौगुले आणि सहकाऱ्यांकडून ‘हास्य जत्रा’ कार्यक्रमाचे, तर मंगळवार, दि.20 रोजी कुँवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित झाडीपट्टी महानाटकाचे सादरीकरण होणार आहे.