गोंडवाना विद्यापीठात रंगलाय तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सव

कर्मचाऱ्यांमधील कलागुणांचे सादरीकरण

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी क्रीडा आणि कलेला दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपलं आयुष्य घडत असून कामातील ताण कमी होत असतो. खेळामुळे सांघिक भावनाही वाढीस लागते, असे मत म्युझिकल मोटिव्हेशनल स्पिकर, आयफा पुरस्कार विजेते तसेच निवृत्त पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी व्यक्त केले.

मंचावर ज्येष्ठ कलावंत नाटककार व दिग्दर्शक विरेंद्र गणवीर, अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, वित्त व लेखाधिकारी सी.ए.भास्कर पठारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.अनिता लोखंडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ.प्रिया गेडाम, अनुप ढोरे, सिनेट सदस्य तसेच कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश पडोळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे प्रशांत रंदई, महासचिव अरुण जुनघरे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ.अनिल हिरेखण म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाने हा अमृताचा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. कामाच्या व्यस्ततेतही आपल्यातील कला जपून ती वृद्धींगत केली पाहिजे. त्यामुळे कामाचा ताण कमी होतो. प्रत्येकामध्येच राजहंस दडलेला असतो, असे ते म्हणाले. या महोत्सवात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

देशभक्तीपर गितांचे सादरीकरण

महोत्सवात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सदाबहार तसेच देशभक्तीपर आणि महापुरुषांच्या गौरव गीतांनी गोंडवाना विद्यापीठाचा परिसर बहरून गेला. या महोत्सवांतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवामध्ये एकल आणि सामुहिक गीत गायन स्पर्धा झाल्या. गीतगायन स्पर्धेपूर्वी दुपारी महिलांच्या रस्सीखेच, खो-खो, संगीत खुर्ची तर पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या.