तेलंगणातून आलेल्या ‘त्या’ रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात घेतला तिसरा बळी

बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी

गडचिरोली : तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेतलेल्या रानटी हत्तीने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर गुरूवारी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. गेल्या १८ दिवसांपासून सिरोंचा वनविभागात असलेला हा हत्ती नुकताच भामरागड वनविभागात दाखल झाला होता. या रानटी हत्तीने अनेक शेतातील पिकांचेही नुकसान केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या कळपातून भरकटत तेलंगणात गेलेल्या या हत्तीने सीमावर्ती भागातील जिल्ह्यात दोन जणांचा बळी घेतला. त्यानंतर हा हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. सिरोंचा वनविभागाअंतर्गत रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात १८ दिवस भटकंती केल्यानंतर हा हत्ती भामरागड वनविभागाच्या जंगलात दाखल झाला होता. यादरम्यान गुरूवारी भामरागड तालुक्यातील कियर येथील गोंगलू रामा तेलामी (53 वर्ष) या शेतकऱ्याचा हत्तीने बळी घेतला. सदर रानटी हत्तीने पेरमिली वनपरिक्षेत्रातील शेतातल्या घरांचे आणि पिकांचेही नुकसान केले आहे.

त्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करा- ब्राह्मणवाडे

गेल्या 2 वर्षांपासून रानटी हत्तींनी जिल्ह्यात हैदोस माजवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. काही महिन्यांपासून या रानटी हत्तीच्या हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र मागील 2-4 दिवसात या रानटी हत्तींच्या हालचाली पुन्हा सुरू होऊन काही नागरिकांचा जीवही गेला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहफूल गोळा करण्यापासून तर तेंदपुत्ता संकलनाचा हंगाम सुरु झाला असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागते. त्यामुळे वन प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय करून रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.