पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीवर महेश तिवारी, अविनाश भांडेकर

गडचिरोली : सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना शासकीय लाभ देण्यासाठी नेमल्या जाणाऱ्या राज्य व विभागीय स्तरावरील समितीत जिल्ह्यातील दोन पत्रकारांची नियुक्ती झाली आहे. त्यात न्यूज १८ लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांची राज्यस्तरीय समितीमध्ये सदस्य म्हणून तर पुण्यनगरीचे प्रतिनिधी तथा गडचिरोली प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर यांची नागपूर विभागीय समितीवर नियुक्ती करण्यात आली. भांडेकर हे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्षही आहेत.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी सदर विभागीय आणि राज्य समिती कार्यरत असते. त्यावर इलेक्ट्रॅानिक्स आणि प्रिंट मिडियातील प्रतिनिधींची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती केली जाते. दोन्ही पातळीवरील समित्यांमध्ये जिल्ह्यातील प्रतिनिधींना स्थान मिळाल्याने माध्यम क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.