राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख बुधवारी जिल्ह्यात

जिल्हाध्यक्षपदी कोण? मेळाव्यात जाहीर करण्याची शक्यता

गडचिरोली : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धर्मरावबाबा आत्राम, अशी आतापर्यंतची स्थिती होती. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्ताधारी युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात धर्मरावबाबा हेसुद्धा अग्रस्थानी होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आता मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने बुधवार दि.१२ जुलै रोजी अभिनव लॅान येथे पक्षाचा मेळावा होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी रोपविली. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यासाठी वैद्य यांची शिफारस महत्वाची ठरणार आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांनी जुन्या जिल्हाध्यक्षांकडून आपल्याला डावलले जात होते, असा आरोप करत त्यांच्यासोबत अजित पवार गटात न जाता मूळ पक्षातच राहणे पसंत केले. याशिवाय पूर्वी फारसे सक्रिय न राहणारे पदाधिकारी आता सक्रिय होण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहराचे प्रथम नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, विद्यमान कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, माजी जि.प.सभापती जगन्नाथ बोरकुटे हे जिल्हाध्यक्षपदाचे दावेदार आहेत. मात्र पक्ष बांधणीच्या दृष्टिने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि एकेकाळचे धर्मरावबाबांचे खंदे समर्थक अतुल गण्यारपवार यांच्याकडे जबाबदारी दिल्यास अधिक फायद्याचे ठरेल, असा सूर उमटत आहे. गण्यारपवार यांना यापूर्वीही पक्षात सक्रिय होण्याबद्दल ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून विचारणा झाली होती, पण जिल्हाध्यक्षपद मिळणार असेल तर येतो, अशी अट त्यांनी टाकल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुनर्प्रवेश होऊ शकला नाही.

बुधवारच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुने जाणते नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकत्रित येऊन शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला उभारी देण्यासाठी सरसावतात का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष राहणार आहे.