गडचिरोलीतील शेतकरी गुजरातमध्ये घेणार दुग्धोत्पादनाचे धडे

50 प्रशिक्षणार्थी आनंदसाठी रवाना, 'आत्मा'चा पुढाकार

प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांच्या बसला शुभेच्छा देऊन रवाना करताना प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील

गडचिरोली : शेतीला जोडधंदा म्हणून दुध उत्पादन घेण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. पण तरीही गडचिरोली जिल्ह्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण कमी आहे. त्याला चालना देण्यासाठी दूध उत्पादनाकडून आर्थिक प्रगती कशी साधता येईल याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ५० निवडक शेतकऱ्यांची चमू गुजरातसाठी रवाना झाली. आत्माच्या खर्चातून राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ, आनंद (गुजरात) येथे त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयामार्फत आत्मा कडून प्राप्त झालेल्या निधीतून गडचिरोली जिल्हयातील 50 दुग्धउत्पादक शेतकऱ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. एका बसमधून ते गुजरातकडे रवाना झाले. शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

यावेळी जिल्हा नेहरु युवा केंद्राचे अमित पुंडे, आपत्ती व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणासाठी जाणारे नेहरु युवा केंद्राचे जिल्ह्यातील युवा प्रतिनिधी पुरुष व महिला, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बचत गटांच्या 50 महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. दिनांक 29 ते 31 मे पर्यंत दुग्धव्यवसाय तथा पशुसंवर्धनाबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम गुजरात येथे राबविण्यात येणार आहेत.