स्रियांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही

अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात मंत्री लोढा यांची ग्वाही

महिलांना योजनांची पुस्तिका देताना भाग्यश्री आत्राम, सोबत अधिकारीगण

गडचिरोली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन गुरुवारी सिरोंचातील तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाले. यावेळी महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आॅनलाईन उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी समस्या समाधान शिबिराचे उद्दिष्ट सांगून जमलेल्या महिलावर्गाला मार्गदर्शन केले. स्त्रियांची कोणत्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, तसेच त्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन शासन महिलांच्या बाबतीत सकारात्मक आहे, त्यांच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालकल्याण विभाग आणि तालुका प्रशासनाच्या वतीने या शिबिराचे आयोजिन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या शिबिराला ऑनलाईन पद्धतीने ना.लोढा यांनी उपस्थिती दर्शविल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष आणि सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तहसीलदार सय्यद, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.कन्नाके, वनपरिक्षेत्र अधिकारी वझारे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिलकुमार पटले, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी पांचाळ, आत्माचे समन्वयक लांजेवार, संरक्षण अधिकारी बुच्चे, पोलिस उपनिरीक्षक कोळी, उपविभागीय अभियंता मसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून बाल विकास प्रकल्प अधिकारी पटले यांनी शिबिराबद्दलची माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त महिलांच्या तक्रारी अपेक्षित असून त्या तत्काळ सोडवून स्त्रियांना न्याय देण्याचे उद्दिष्ट्य मांडले. तहसीलदारांनी तालुका प्रशासन आपल्या तक्रारी सोडवण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले.

शिबिराच्या माध्यमातून उपस्थित महिलांच्या तक्रारी ऐकून व सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. या शिबिराला 190 महिलांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी एकूण 65 महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एकूण 18 तक्रारी वेळेवर त्याच ठिकाणी सोडवून महिलांचे समाधान करण्यात आले. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या. आभार प्रकाश भांदककर यांनी मानले.