गोंडवाना विद्यापीठात शुक्रवारी होणार आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन

हैदराबादचे अभ्यासक प्रा.भांग्या भुक्या यांची राहणार उपस्थिती

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन १ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख तथा आदिवासी अभ्यासक प्रा.भांग्या भुक्या राहणार आहेत.

प्रा.भुक्या यांचे आधुनिक भारताचा इतिहास व विदर्भ प्रांतातील गोंड जमाती अध्ययनावर आधारित ‘द रूट ऑफ द पेरीफेरी’ हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, तसेच विशेष निमंत्रित म्हणून सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रभू राजगडकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.

काय आहेत उद्दिष्ट्ये, कशाचे होणार संशोधन?

गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आदिवासींचे जीवन, संस्कृति व भाषा, त्यांच्या समस्या, विकास-योजना आणि त्यांची आदिवासींच्या भविष्याच्या दृष्टीने फलश्रुति किती झाली व आणखी कशी होऊ शकेल, याबाबतच्या संशोधनाला खूप वाव आहे. त्या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राची स्थापना महत्वाची ठरणार आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी जमातींच्या संदर्भात संशोधन आणि त्यावर आधारित विकास यावर संशोधन करणे, विकास तसेच विस्तार कार्य करणे हे ही या केंद्राची मुख्य उद्दीष्ट्ये आहेत. याशिवाय भारतातील आदिवासींचे जीवन आणि समस्यांवर हे केंद्र संशोधन करू शकेल. आदिवासींच्या जीवन, संस्कृति यांचा अभ्यास, त्यांचे संहितीकरण व जतन, त्यात झालेली सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तने, त्यांचे परंपरागत नेतृत्व आणि आदिवासींचे शोषण व त्यातून उद्भवणारी नवीन आव्हाने इत्यादी गोष्टींचा अभ्यास या केंद्रामार्फत केला जाईल.

संशोधनासोबतच विस्तार – सेवा आणि प्रबोधनाचेही कार्य या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.वैभव मसराम यांनी केले आहे.