गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर सोमवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अनेक मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावर तोडगा न काढल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, अशी भूमिका काँग्रेसने पत्रकारांपुढे जाहीर केली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केलेल्या मुद्द्यांमध्ये जिल्ह्यातील रस्त्यांचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरजागडची वाहतूक पूर्णपणे बंद करावी, मका व धान खरेदी केंद्रांच्या खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी, पिक विम्याची तिसऱ्या टप्प्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात अजूनही शेतीच्या वीज पुरवसाठी लोडशेडिंग सुरू असल्याने तातडीने ते बंद करावे, आरमोरी येथे 132 केवी विद्युत केंद्र मंजूर करावे, शासकीय रेती उत्खनन केंद्रातील रेतीचे तत्काळ वितरण करण्यात यावे व घरकुलधारकांना मोफत किमान पाच ब्रास रेती उपलब्ध करून यावी, रपरिषद गडचिरोली प्रशासनाने, भूमिगत गटार योजनेवर 100 कोटी रुपये खर्च केले ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी, नगरपरिषद गडचिरोलीने लावलेला नवीन घरटॅक्स कमी करावा, चामोर्शी तालुक्यातील कळमगाव उपसा बॅरेजचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, शालेय मान्सून सत्र सुरू होत असल्याने एसटी बसेस नियमित व जादा प्रमाणात सोडण्यात याव्या यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.पप्पू हकीम, किसान सेलचे अध्यक्ष वामन सावसागडे, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अल्पसंख्यांक अध्यक्ष आरिफ कनोजे, दत्तात्रेय खरवडे, हरबाजी मोरे, भैय्याजी मुद्दमंवार, सुनील चडगुलवार, रजाक पठाण, सुरेश भांडेकर, मधुकर सडमेक, ठिवरु मेश्राम, राघोबा गौरकार, नामदेव आत्राम, नितेश राठोड, फिरोज हुड्डा, जावेद खान उपस्थित होते.