श्रीमंत गडचिरोली जिल्ह्यातील माणसं आता गरीब राहणार नाहीत

कुठे आणि का असं म्हणाले आ.गजबे

देसाईगंज : सर्वजण म्हणतात गडचिरोली हा गरीब जिल्हा आहे. पण वास्तविक पाहता हा जिल्हा गरीब नाही, मोठ्या प्रमाणात खनिज आणि वनसंपत्ती असणारा हा श्रीमंत जिल्हा आहे. मात्र जिल्ह्यातील माणसं गरीब आहेत. असे असले तरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या उद्योगांमुळे, लोहखाणींमुळे या जिल्ह्यातील माणसंही आता गरीब राहणार नाहीत, असा विश्वास आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केला.

देसाईगंज पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2023-24 च्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुडूलकर, सरपंच प्रशाला गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश ठाकरे, पोलिस पाटील मंगेश मडावी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.