पत्नीची हत्या करून झाला छू मंतर, वेषांतर करून पोलिसांनी केले अंदर

सिनेस्टाईल पकडलेल्या आरोपीची कहाणी

कोरची : पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्याने चक्क उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावन गाठले. तेथील एका धार्मिक आश्रमात साधूचा वेष घेऊन राहू लागला. आता पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, अशा विश्वासात तो असताना कोरची पोलिसांनी त्याचीच शक्कल लढवत विविध वेष घेऊन त्याचा माग काढला. अखेर त्याला गाठून बेड्या ठोकत कोरचीला आणले. चार दिवसांच्या पीसीआरनंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ही कहाणी आहे गेल्या २ जुलैला आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची हत्या आणि मुलीवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या प्रितराम भक्तू धकाते (४८ वर्ष) या कोचीनारा या गावातील आरोपीची. त्याला पकडून आणल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत घटनेची पार्श्वभूमीही स्पष्ट केली. प्रितरामला एक दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीने लव्ह मॅरेज करण्यासाठी घरातून पळ काढला होता. दुसऱ्या मुलीचेही लव्ह कम अरेंज मॅरेज झाले. तिचे घर गावातच आहे. मुलाचेही लग्न झाले पण वडीलांसोबत पटत नसल्याने तो वेगळा राहात होता. अशात मुलगा आणि गावातील जावयाने प्रितरामकडे संपत्तीत हिस्सा मागितला. शेतात राबून सर्व कर्तव्ये पार पाडूनही मुलामुलींसोबत पटत नसल्याने त्याची मनस्थिती ठिक नव्हती. त्यातच पत्नीनेही मुलगा व जावयाची बाजू घेतल्याने तिच्याशी भांडण झाले. त्यामुळे पत्नी गावातील मुलीकडे राहायला गेली. यामुळे एकट्या पडलेल्या प्रितरामची मनस्थिती आणखीच बिघडली. अशात त्याने २ जुलै रोजी जंगलात जळाऊ लाकडे आणण्यासाठी गेलेल्या पत्नीवर कुऱ्हाड चालवून तिची हत्या केली. यावेळी सोबत असलेल्या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रितरामने तिच्यावरही हल्ला करून तिला जखमी केले.

डोंगरगड, अहमदाबाद, मथुरेचा प्रवास
प्रितरामचा हातातील कुऱ्हाड घेतलेला अवतार पाहून जंगलात गेलेल्या इतर महिलाही घाबरून गेल्या. संपूर्ण गावच यामुळे दहशतीत आले. त्यामुळे कोणी या घटनेबद्दल ब्र काढायला तयार नव्हते. पण पोलिस आता आपल्याला पकडणार म्हणून घाबरून गेलेल्या प्रितरामने कसेबसे डोंगरगड (छत्तीसगड) गाठले. तेथून त्याला अहमदाबादला (गुजरात) जाणारी ट्रेन मिळाली. त्याने लगेच जनरल डब्यात बसून अहमदाबाद गाठले. तेथून त्याने दिल्लीकडे जाणारी गाडी पकडून मथुरा गाठले. हा सर्व प्रवास त्याने तिकीट न काढताच केला. मथुरेतून तो जवळच असलेल्या वृंदावनमध्ये आला. त्या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळांमध्ये अनेक साधू राहात असल्याचे पाहून त्यानेही साधुचा भगवा ड्रेस परिधान केला आणि एका आश्रमात त्याने आश्रय घेतला.

दोन किलोमीटर परिसरात शोधायचे कसे?
वृंदावनमधील ललित आश्रमात प्रितरामचा प्रवेश मिळाल्यानंतर तो निश्चिंत झाला होता. त्यामुळे त्याचा मोबाईलही सुरू होता. पोलिसांनी त्यावर कॅाल करून पाहिले तर तो गावाकडेच वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे बिनधास्तपणे सांगत होता. मात्र त्याच्या मोबाईलचे लोकेशन वृंदावनमध्ये दिसत होते. तो आपली दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच कोरचे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी तीन पोलीस अंमलदारांना घेऊन वृंदावन गाठण्याचे ठरविले. अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि एसडीपीओ साहील झरकर यांची परवानगी घेऊन हे पथक खासगी वाहनाने वृंदावनला पोहोचले. पण प्रितरामचे बीएसएनएल कडून केवळ दोन किलोमीटर परिसरातील लोकेशन मिळत होते. आता दोन किलोमीटर परिसरात त्याला कुठे आणि कसे शोधायचे याचे आव्हान पोलिस पथकापुढे होते.

पोलिसांनीही केले वेषांतर
वृंदावनमध्ये अनेक धार्मिक आश्रम असल्यामुळे तिथेच कुठेतरी तो आश्रयाने असावा याचा अंदाज पोलिसांना आला. सोबत त्याला दारूचेही व्यसन होते. त्यामुळे चार जणांच्या या पथकाने वेगवेगळ्या वेशभुषा करत शोधमोहीम सुरू केली. स्वतः एपीआय फुलकवर यांनी साधूचा वेष घेतला. एका अंमलदाराने दारू अड्ड्यावर शोध घेण्यासाठी मद्यपीचे सोंग घेतले, तर एकजण रिक्षावाला झाला. एक जण चकना विक्रेता झाला. दिवसभर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शोध घेतला जात होता पण चार दिवस होऊनही शोध लागत नव्हता. पाचव्या दिवशी दिवसभराच्या मोहिमेनंतर रात्री हे पथक पुन्हा शोधमोहिमेवर निघाले. तेव्हा ललित आश्रमाजवळ रात्री दिड वाजता त्यांना प्रितराम साधुच्या वेषात झोपलेला आढळला. मोबाईलमधील फोटोवरून खात्री करून घेऊन त्याला ताब्यात घेतले. वेषांतर केलेल्या पोलिसांना पाहून तोसुद्धा चक्रावून गेला. त्याला तसेच कोरचीपर्यंत आणण्यात आले. त्याला अटक झाल्याचे कळताच गावकऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

या कामात एपीआय फुलकवर यांना पोलीस हवालदार तेजराम मेश्राम, पोलीस शिपाई नरेंद्र धोंडणे, शिवशंकर भालेराव यांनी विशेष मदत केली. या आरोपीविरोधात कलम ३०२, २२६, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली.