नवीन शासन निर्णयानुसार होणार जिल्ह्यातील तलाठ्यांची पदभरती

महसूलमंत्री विखे पाटलांचे दोन्ही आमदारांना आश्वासन

गडचिरोली : गडचिरोलीसह राज्यातील सर्व पेसा क्षेत्रातील पदभरतीत ओबीसी उमेदवारांवर झालेला अन्याय शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयावर बैठक बोलविली. त्यात पेसा क्षेत्रातील तलाठ्यांची पदभरती २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसारच घ्या, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे आणि आमदार डॅा.देवराव होळी यांनी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे झालेली चूक दुरूस्त होण्याची शक्यता आहे.

बैठकीला ओबीसी नेते, माजी मंत्री आमदार संजय कुंटे हेसुद्धा उपस्थित होते. अर्ज भरलेल्या कोणत्याच प्रवर्गातील उमेदवारांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली. २०२३ च्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील जागांची माहिती घेऊनच पुढील निर्णय घेऊ असे सकारात्मक आश्वासन महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये तलाठी पदभरतीत पेसा क्षेत्रातील पदभरती दि.९ जून २०१४ च्या जुन्या अधिसुचनेनुसार केली जात असल्याने जिल्हयातील ओबीसी समाजासह इतर समाजाच्या उमेदवारांसाठी अत्यल्प जागा राहून त्यांना शासकीय नोकरीपासून वंचित रहावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याकरिता दि.१ फेब्रुवारी व दि.२८ फेब्रुवारी २०२३ च्या नवीन शासन निर्णयात नमूद प्रवर्गनिहाय आरक्षण व बिंदुनामावलीप्रमाणे पदभरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे व आमदार डॉ.देवराव होळी यांनी मंत्रालयीन दालनात ना.विखे पाटील यांनी बोलविलेल्या बैठकीमध्ये केली.

दि.२० जुलै २०२३ रोजी शासनाला अहवाल प्राप्त झाला असल्याने लवकरच शुद्धीपत्रक काढण्याची कार्यवाही करून दि.१ फेब्रुवारी व २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयात नमूद प्रवर्गनिहाय आरक्षण व बिंदुनामावलीप्रमाणे तलाठी पदभरतीचा घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.