तीन दिवसानंतर भामरागडात वीज, मोबाईल नेटवर्क झाले सुरू

सहा मार्गांवरील वाहतूक अद्याप ठप्प

पर्लकोटा नदीवरील पूर गुरूवारी ओसरल्यानंतर पैलतीरावर जाण्यासाठी सज्ज असलेले नागरिक.

गडचिरोली : जिल्ह्यात पावसाचा जोर आता कमी झाला आहे. गुरूवारी आॅरेंज अलर्ट असला तरीही पावसाची तीव्रता कमी होती. सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात 38.3 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून भामरागडमध्ये वीज पुरवठा आणि मोबाईल नेटवर्क ठप्प होते. गुरूवारी सकाळी मोबाईल नेटवर्क, तर रात्री 8.45 वाजताच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच भटकंती करावी लागली.

पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहात असल्याने सलग तीन दिवस भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता. गुरूवारी पूर ओसरल्याने वाहतूक सुरू झाली. पण भामरागड ते लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी (गुंडेनुर नाना, बिनागुंडा नाला) हा मार्ग बंदच होता. याशिवाय सिरोंचा ते पर्सेवाडा मार्ग (स्थानिक नाला), पुसुकपल्ली ते जाफराबाद मार्ग (स्थानिक नाला), अहेरी ते मोयाबीनपेठा ते वटरा राज्यमार्ग (वटरा नाला ), कंबालपेठा ते जाफराबाद मार्ग (स्थानिक नाला) आणि अंकिसा ते चिंतरवेला (स्थानिक नाला) हे मार्ग गुरूवारी सुद्धा बंद होते.

शुक्रवारी पावसाच्या बाबतीत येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे झालेली त्रेधातिरपट दूर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.