मुलाची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या निर्दयी बापाला जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा न्यायाधीश उदय शुक्ल यांचा निवाडा

गडचिरोली : कोंबडा कापल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणातून राग अनावर झालेल्या निर्दयी बापाने कुऱ्हाडीचे घाव घालत आपल्या तरुण मुलाचा खून करण्याची घटना अहेरी तालुक्यातील येंकाबंडा गावात घडली होती. या प्रकरणी गुरूवारी (दि.10) जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी आरोपी वडीलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

रामा गंगा कोडापे असे आरोपी वडीलाचे तर शंकर रामा कोडापे असे मृत मुलाचे नाव आहे. 4 जानेवारी 2021 रोजी ही घटना घडली होती. रामाचा मुलगा शंकर, पत्नी राधा आणि त्यांची छोटी मुलगी असे हे कुटुंब येंकाबंडा येथे राहात होते. घटनेच्या दिवशी दुपारी दिड वाजताच्या सुमारास शंकर याने वडील रामाला माझा कोंबडा का कापलास, असे विचारले. यावरून दोघा बाप-लेकात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रामा याने मुलगा शंकर याला घरातील बाजेवर ढकलले आणि घरातून लोखंडी कुऱ्हाड आणून शंकरवर निर्दयीपणे वार केले. यामुळे जागीच निपचित पडून त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सासरा घरून निघून जाताच शंकरची पत्नी राधा हिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथेच मरण पावला होता. जिमलगट्टा पोलिसांनी तक्रारीवरून भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास करत सर्व पुरावे गोळा केले. न्या.शुक्ल यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयाण ग्राह्य धरून आरोपी रामा कोडापे याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास 6 महिने वाढीव शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकारतर्फे अॅड.एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास पो.उपनिरीक्षक राहुल मंचकराव फड यांनी केला.