मार्कंडेश्वर देवस्थानाच्या निविदेतील अडचण दूर करण्यासाठी दिल्लीत बैठक

खासदार अशोक नेते यांचे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश

पुरातत्व विभागाच्या वरिष्ठांशी दिल्लीत चर्चा करताना खा.अशोक नेते

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराच्या अर्धवट असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत बैठक लावली. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कामाचा आढावा घेऊन निविदा प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात आल्या. आता हे काम लवकर पूर्ण करा, असे निर्देश खा.नेते यांनी दिले.

मार्कंडा देवस्थानाच्या पुनर्बांधणीच्या निविदेसंदर्भामध्ये काही अडचणी येत होत्या. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या व पाठपुराव्यासाठी खासदार अशोक नेते प्रयत्नशिल होते. त्या अडचणी दूर करण्यासाठी खासदार नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटीदरम्यान माहिती दिली होती. अखेर भारतीय पुरातत्व विभागाचे महानिर्देशक के.के. बासा, एडीजी जानविश शर्मा, एडीजी डॉ.अलोक त्रिपाठी, संचालक सुंदर पाल, अधीक्षक अभियंता एस.के. कन्ना यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत मंदिर बांधकामाच्या निविदा प्रक्रियेतील अडचण दूर झाली.

या बैठकीमध्ये मार्कंडा देवस्थान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लाऊन मंदीर बांधकाम पूर्ण करण्यासाठी सर्व समस्या दूर करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. मार्कंडा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यास मार्कंडा मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सोयी सुविधा निर्माण होणार आहेत.