मुलचेरा तालुक्यात पुन्हा एक व्याघ्रबळी, कोडसापूरच्या महिलेचा घेतला बळी

दोन आठवड्यात तिघे झाले शिकार

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या वाघांनी देसाईगंज, आरमोरी आणि गडचिरोली तालुक्यात अनेकांचा बळी घेतल्यानंतर आता आपला मोर्चा हळूहळू जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वळविला आहे. सोमवारी मुलचेरा तालुक्यातील कोडसापूर येथील रमाबाई शंकर मुंजमकर (५५ वर्ष) ही महिला वाघाच्या हल्ल्याला बळी पडली.

प्राप्त माहितीनुसार, रमाबाई दुपारी आपल्या घरालगतच्या शेतात कापूस वेचणी करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर रमाबाईला रेंगेवाही उपवनक्षेत्रातील कोपरअली बिटमध्ये जवळपास २०० मीटर फरफटत नेले. मानेवर खोल जखम होऊन ती जागीच ठार झाली.

रमाबाईचा मुलगा राहूल कोपरअली येथील बाजार आटोपून घरी परतल्यानंतर आई दिसत नसल्याने ते तिला शोधत शेतात आला. त्यावेळी रमाबाईची रक्ताने माखलेली साडी दिसली. गावकऱ्यांना ही गोष्टी माहीत होताच त्यांनी शोधमोहीम सुरू केली असता लगतच्या जंगलात मृतदेह आढळला.

मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, क्षेत्र सहायक आय.पी.मांडवकर आणि चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गेल्या दोन आठवड्यात वाघाने घेतलेला हा तिसरा तर नवीन वर्षातला दुसरा बळी आहे.